बंद

विटयातील पालखी शर्यत

श्रेणी अन्य
  • विटा ता. खानापूर येथे विजया दशमीला दोन देवांच्‍या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्‍या 155 वर्षांची परंपरा असलेल्‍या देवांच्‍या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्‍ट्रात प्रसिध्‍द आहेत.
  • विटयातील श्री रेवणसिध्‍द व मूळ स्‍थान रेवणसिध्‍द या दोन पालख्‍यांच्‍या शर्यती विजयादशमीचे खास आकर्षण आहे. दस-या दिवशी मूळ स्‍थानची रेवणसिध्‍द देवाची पालखी विटयातील श्री भैरवनाथ मंदिरात येते.
  • मूळस्‍थान रेवणसिध्‍द व विटा येथील श्रीरेवणसिध्‍द या दोन पालख्‍यांची आरती झाल्‍यावर देवाच्‍या सासनकाठया, देवांना वारे घालणा-या चव-या, आबदागिरी, चांदीच्‍या काठया, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्‍या निनादात या पालख्‍या शर्यतीसाठी सज्‍ज होतात. या दोन्‍ही पालख्‍यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. त्‍यानंतर दोन पालख्‍या काळेश्‍वर मंदिराजवळ येतात. मूळ स्‍थानची पालखी पाहुणी असल्‍याने तिला पाच पावले पुढे थांबण्‍याचा मान दिला जाते. त्‍यानंतर डाव्‍या बाजूला विटयाची तर उजव्‍या बाजूला मूळ स्‍थानची मंडळी पालखी घेऊन धावण्‍यासाठी सज्‍ज होतात.
  • विजयादशमीला सायंकाळी 5.00 वाजता दोन देवांच्‍या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्‍वर मंदिर ते खानापूर रस्‍त्‍यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्‍यासाठी पालखीचे खांदेकरी कसब पणाला लावून शिलंगण मैदानापर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करतात. शिवाजी चौक, बसस्‍थानक मार्गे या पालख्‍या शिलगंण मैदानाकडे धावतात त्‍यावेळी रस्‍त्‍यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळ स्‍थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्‍याचा प्रयत्‍न करतात. यातून सुटका करुन घेऊन दोन्‍ही पालख्‍या शिलंगण मैदानात धाव धेतात. जी पालखी अगोदर पोहोचते. तिला विजयी घोषित केले जाते. त्‍यानंतर पाठीमागून श्री. भैरवनाथ, श्री म्‍हसवडसिध्‍द श्री भैरोबा या देवांच्‍या पालख्‍या शिलंगण मैदानात जातात.
  • विटा येथील रेवणसिध्‍द व मूळ स्‍थानचा रेवणसिध्‍द या दोन पालख्‍यांची विटयातील मारुती व विठठल मंदिरासमोर आरती केली जाते.
  • शिलंगण मैदानात दस-याच्‍या शुभेच्‍छा देण्‍यासाठी लाखो भाविक मैदानात हजेरी लावतात आणि आपटयाची पाने (सोने) एकमेकांना देतात. सर्व पालख्‍या शिवाजी चौकात येतात व रात्रभर लोककलेचा कार्यक्रम सादर केला जातो.

जात,पात, धर्म, गट, तट यांच्‍या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्‍वीरित्‍या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्‍यासाठी आजही प्रयत्‍नशील आहेत.