मीरासाहेब उरुस संगीत सभा
श्रेणी अन्य
- सर्व धर्म भावाचे प्रतिक असलेल्या मिरजेच्या ऐतिहासिक मीरासाहेब दर्ग्याचा उरुस गेली अनेक शतके साजरा करण्यात येत आहे.
- अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा, मानाचा गलेफ, सर्वधर्मीयांचा सहभाग ही मिरजेतील दर्गा उरुसाची वैशिष्ठये आहेत मीरासाहेब दर्ग्याची भव्य इमारत पंधराव्या शतकात उभारण्यात आलेली आहे. सामाजिक ऐक्याचा संदेश देणा-या दर्ग्याच्या उरुसात मानाचा गलेफ अर्पण करण्याचा मान चर्मकार बांधवांना आहे. सवाद्य मिरवणुकीने मानाचा गलेफ अर्पण करण्यात येतो.
- किराणा घरण्याचे अध्वर्यू संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच मिरज ही कर्मभूमी. अब्दुल करीम खाँ हे दर्गा उरुसानिमित्त दर्ग्यातील चिंचेच्या झाडाखाली गानसेवा करीत. अब्दुल करीम खाँ यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शिष्यांनी ही पंरपरा सुरु ठेवली आहे. 1938 मध्ये ऑल इंडिया रेडीओ वरुन दर्ग्यातील संगीत सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
- गेली 77 वर्षे दर्गा उरुसात अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत देशातील दिग्गज गायक, वादक हजेरी लावत आहेत. संगीत सभा हे उरुसाचे आगळे-वेगळे वैशिष्टय आहे. दर्गा आवारातच अब्दुल करीम खाँ यांची समाधी आहे. उरुसानिमित्त गंधलेपण, महेफिल-ए-समा हा कव्वालीचा धार्मिक कार्यक्रम, कुस्ती मैदान होते. प्रशासनासह विविध संस्थाकडून गलेफ अर्पण करण्यात येतात. मिरजेच्या दर्ग्यावर तत्कालिन संस्थानिकांची मोठी श्रध्दा होती. त्यामुळे दर्ग्याला मोठया प्रमाणात इनामी जमीन देण्यात आली आहे.उरुसानिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातून वेगवेगळया पंथाचे फकीर, तृतीयपंथी एकत्र येतात. मिरवणुकीने गलेफ अर्पण करतात. उरुस साजरा करण्यासाठी मुस्लिमापेक्षा हिंदूचा सहभाग मोठा असतो. दर्ग्यामुळे मिरजेला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.