आष्टयाचा भावई उत्सव
श्रेणी अन्य
- सांगली जिल्हयातील आष्टा (ता. वाळवा) येथील चौंडेश्वरी देवी म्हणजेच अंबामातेचा भावई उत्सव प्रसिध्द आहे.
- शेकडो वर्षाची परंपरा आष्टेकरांनी भावईव्दारे भक्तभावाने जोपासली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चौंडेश्वरीचे हेमाडपंथी मंदिर आहे. अष्टभुजायुक्त महिषासुरमर्दिनीच्या रुपातील अखंड पाषाणातील रेखीव व करारी रुपातील मूर्ती आहे.
- भावई उत्सव हा शाक्त सांप्रदायिक खेळ आहे. तो मूळचा कर्नाकातील बदामीचा असून, तेथे बंद होऊन आष्टा येथे शेकडो वर्षापासून साजरा होत आहे.
- याबाबत एक कथा सांगितली जाते ती म्हणजे इ.सन. 1316 मध्ये वाळव्याच्या थोरात सरकारना कर्नाटकातील बदामी लुटीत एक पेटी मिळाली. ती उघडली असता त्यातील एक मुखवटा उडून गेला. त्यातील दुस-या मुखवटयाप्रमाणे आणखी एक मुखवटा तयार केला गेला. पेटीतील तीन ताम्रपटांवरील देवीच्या ऐतिहासिक माहितीवरुन बारा बलुतेदारांनी आष्टा येथे भाई उत्सव सुरु केला. भावई उत्सवातील सर्व खेळात मानकरी असणारे बारा बलुतेदार सहभागी होतात. खेळ सुरु होण्यापूर्वी एक महिना मंदिरात रणवाद्य सुरु असते. जेष्ठ वद्य दशमीपासून दिवा विधीने खेळाला सुरुवात होते.
- 19 दिवसांच्या खेळात दिवा, कंकणविधी, आळूमुळू, घोडी, पिसे, थळ उठविणे, जोगण्या, लोट, लहू, मुखवटे, पाखरे, बाजले, चोर सती, चिटक्या मिटक्या आदी प्रकार असतात. आषाढी एकादशीला चौंडेश्वरी मंदिरात शिंग, कैताळ, संबळ, पावा या वाद्यांच्या गजरात देवीपुढे नृत्य केले जाते.