बंद

जिल्ह्याविषयी

भूगोल

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्‍नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्‍याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.

सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.

सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २०११ सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.

निर्मिती

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.

विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.

औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.

संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्‍न करत आहे.

सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.

नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र – मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.

ऐतिहासिक महत्त्वाचे

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात

दळणवळण

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.

मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. सांगली हा महत्त्वाचा जिल्हा असल्याने आपल्याला येण्याची जाण्याची सोय चांगली आहे.

शेती

जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्‍यांत काळी-कसदार जमीन आढळते.

सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस

राजकीय संरचना

सांगली – मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)

विधानसभा मतदारसंघ

जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.