नाविन्यपूर्ण उपक्रम > स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबीर > बुधवार, ०९ जानेवारी, २०१३

18 Oct

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आत्मविश्वास, जिद्द, योग्य नियोजन असल्यास यश तुमचेच असा विश्वास आय. पी. एस. अधिकारी श्रीधर पाटील, आय. आर. एस. अधिकारी सुहेल काझी आणि गट विकास अधिकारी रविकांत आडसूळ या प्रशासनातल्या तीन यशस्वी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा राजमती भवन येथे आयोजित करण्यात आली होती.

मूळचे कोल्हापूरचे असणारे श्रीधर पाटील हे सध्या जम्मू काश्मिर मधील अनंतनाग या जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक तर सुहेल काझी हे मूळचे सोलापूरचे असून सध्या ते सांगली येथे सहायक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क तथा सेवा कर या पदावर कार्यरत आहेत. यांच्यासह मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले रविकांत आडसूळ हे मूळचे कोल्हापूरचे असून ते सध्या प्रशिक्षणार्थी उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व गटविकास अधिकारी पंचायत समिती पलूस या पदी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे हे तीनही अधिकारी सर्वसामान्य कुटुंबातील असूनही त्यांनी हे यश प्राप्त केले आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, महाराष्ट्रीयन तरुण निश्चितच हुशार, मेहनती, प्रामाणिक तर आहेच. परंतु वेळेचे योग्य नियोजन, योग्य निर्णय क्षमता, स्वत:मधील कौशल्य ओळखून त्यादृष्टीने स्वत:चे भवितव्य घडविण्याचे तंत्र या गोष्टींच्या अभावामुळे स्पर्धात्मक परीक्षेत त्यांचे यशाचे प्रमाण मात्र अजूनही हवे तितके समाधानकारक नाही. मात्र आजच्या काळात माहितीचा स्त्रोत वाढला असल्यामुळे योग्य वयात योग्य त्या मार्गदर्शनाने स्पर्धात्मक परीक्षेतील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांची टक्केवारी निश्चितच वाढत आहे. आपली आवड, आपल्यातील कौशल्य ओळखून आपले ध्येय निश्चित करुन योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश हे हमखास मिळतेच, असे त्यांनी सांगितले.

ते यावेळी म्हणाले, देशाला आपली गरज आहे ही भावनाच आपल्याला प्रेरणादायी ठरते आणि त्या प्रेरणेतूनच आपण यश मिळवण्यासाठी अधिकाधिक जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विषयांची निवड ही स्वत:ची आवड, आवश्यक असलेले उपलब्ध साहित्य या बाबीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत मी आणि माझे ध्येय यापलिकडे काहीच नाही अशा आत्मविश्वासाने झटून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा.

यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून लवकरच वाचनालय तसेच अभ्यासिका सुरु करण्यात येणार असून या वाचनालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यापुढे अशा प्रकारच्या विनामूल्य मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा या प्रत्येक महिन्याला पहिल्या आठवड्यात भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या उद्देशाबद्दलचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचलन तहसिलदार महसूल स्वाती शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले.

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli