नाविन्यपूर्ण उपक्रम > स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबीर > गुरुवार, ०८ नोव्हेंबर, २०१२

स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यातील मुले इंग्रजी विषयात कमी पडतात यासाठी राज्य शासनाने मराठीत विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर लिहिण्याची सोय केली आहे. ग्रामीण भागातील मुलांनी जिद्दीने व आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात करुन या परीक्षांमध्ये यश संपादन केले पाहिजे, असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आय. पी. एस. अधिकारी प्रियंका नारनवरे, सहायक विक्रीकर आयुक्त मनिषा तारळेकर उपस्थित होते.

समाजाची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने अत्यंत उपयुक्त असा स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देऊन डॉ. कदम यांनी नवीन आलेले अधिकारी उत्तम प्रकारे प्रशासन चालवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीतून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा केंद्राचा पुरेपूर लाभ घेऊन आपली प्रगती करावी. मीही अत्यंत गरीबीतून आज तुमच्या पुढे उभा राहिलो आहे, असेही त्यांनी यावेळी उदाहरणादाखल सांगितले.

प्रारंभी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सौ. मनिषा कुंभार यांनी जिल्हाधिकारी श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रेरणेतून व कल्पनेमुळेच आज स्पर्धा परीक्षा मागदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी डी. एस. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत पाटील, विभागीय वन अधिकारी एम. एस. भोसले, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, तहसिलदार जयश्री शेंडे, स्पर्धा परीक्षेस बसलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli