नाविन्यपूर्ण उपक्रम > स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबीर > शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३

12 Apr

जग बदलण्यासाठी आधी स्वत: बदलणे आवश्यक - डॉ. प्रशांत नारनवरे

प्रशासकीय सेवा हा जनतेची सेवा करण्यासाठी एक उत्तम मार्ग असला तरी जग बदलण्यासाठी आधी स्वत: बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा विष्णूदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह तर मार्गदर्शक म्हणून राज्य उत्पादन शुल्क या विभागातील परिविक्षाधीन अधीक्षक स्नेहलता श्रीकर आणि जिल्हा नियोजन विभागातील लेखाधिकारी उत्कर्ष कवठेकर हे उपस्थित होते.

डॉ. नारनवरे म्हणाले, युपीएससी परिक्षेतील पूर्वपरिक्षेसाठी संपूर्ण भारतातून जवळपास तीन लाख विद्यार्थी अर्ज भरतात, त्यापैकी दीड लाख विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला बसतात आणि जवळपास त्यातून 25 हजार विद्यार्थी मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरतात. म्हणजेच खरी स्पर्धा ही या 25 हजार विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करताना आत्मविश्वास, जिद्द, योग्य नियोजन याबरोबरच आपण नेमक्या कोणत्या पदासाठी परिक्षा देणार आहोत याचा आधी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ठरविलेल्या निर्णयानुसार संबंधित परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम समजून घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वत:च्या नोट्स स्वत: तयार करणे, प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र फाईल्स तयार करणे, प्रत्येक गोष्टीत स्वत:ला शिस्त लावणे, विविध विषयांची नीट मांडणी करणे या गोष्टी स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

आपण ज्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहतो त्या पदासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या गुणांचा विकास आपल्या पूर्ण व्यक्तिमत्त्वात होणे तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच समाजात कोणताही चांगला बदल घडविण्यासाठी आधी स्वत:पासून सुरुवात करायला हवी असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती श्रीकर म्हणाल्या, एमपीएससीचे नवे स्वरुप निश्चितच स्वागतार्ह असून युपीएससीच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम असल्याने परिक्षार्थींचा त्यातून सर्वांगीण विकासच होणार आहे. स्पर्धा परिक्षेतील कोणत्याही विषयाच्या अभ्यासासाठी सर्वप्रथम प्राथमिक आणि मूलभूत पुस्तकांचा अभ्यास करणे ही बाब निश्चितच आवश्यक असून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पाहून, स्वत:ची क्षमता ओळखून आपल्याला नेमक्या कोणत्या पदासाठी परिक्षा द्यायची आहे हे योग्य वेळेतच निश्चित करावे. मुलाखतीसाठी स्वत:विषयीच्या सर्व बाबींचा, गुण वैशिष्ट्यांचा, सवयींचा सूक्ष्म अभ्यास करावा.

श्री. कवठेकर यांनी सांगितले, या स्पर्धेच्या युगात बदलत्या परिस्थितीत आपण स्वत:ला बदलायलाच हवे. आताच्या स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ माहितीपर अभ्यास न करता आपली आकलन शक्ती वाढविणे, विषय समजून घेवून गुणात्मक अभ्यास करण्यावर भर द्यावा. या सर्व गोष्टींसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणेही तितकेच महत्त्वाचे असून जो खरा असेल, प्रामाणिक असेल तोच या स्पर्धेत टिकेल आणि यशही संपादन करेल.

यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उपस्थित अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला आणि नजीकच्या काळात होणाऱ्या स्पर्धा परिक्षांसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यशाळेचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले. तर समन्वयक म्हणून प्रविण माळवे, विनायक यादव, प्रदीप पाटील, जावेद भोजगर, अरुण कोकाटे यांनी काम पाहिले.

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli