सांगली विषयी > इतिहास

पूर्वीच्या अखंड सातारा जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून १ ऑगस्ट १९४९ ला ‘दक्षिण सातारा’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला आणि पुढे त्यात नव्या तालुक्यांची भर घालून २१ नोव्हेंबर १९६०ला ‘सांगली जिल्हा’ हे नवं नामाभिधान करण्यात आलं. या जिल्ह्यात आता मिरज, कवठे महांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, पलुस, वाळवा, शिराळा, विटा-खानापूर आणि कडेगाव असे एकूण दहा तालुके असून लोकसंख्या जवळजवळ २९ लाख एवढी आहे. जिल्ह्यातली जमीन काळी, तांबडी आणि पिंगट अशा तीन प्रकारांची आहे. कृष्णा, वारणा, मोरणा, बेरळा, अग्रणी, माणगंगा इत्यादी नद्या या प्रदेशातून वाहतात. जिल्ह्यातील ७० टक्के लोक शेती करतात आणि भात, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी, करडई, कापूस, मिरची, गहू, हरभरा, भुईमूग, हळद, तीळ, तंबाखू आणि ऊस अशी खरीप आणि रब्बी पिकं घेतात. अलीकडच्या काळात द्राक्षं आणि डाळिंबांचं फलोत्पादनही लक्षणीय स्वरूपात होताना दिसतं. इथले शेतकरी कष्टाळू, प्रयोगशील आणि नवनवीन पर्यायांचा विचार करणारे असून प्रतिकूल परिस्थितीत हिंमत न हरणारे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील वाळवा-शिराळा भागात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण भरपूर असून, पूर्वेकडील जत, आटपाडी, कवठे महांकाळ अशा भागांत हेच प्रमाण अत्यल्प असल्याने हा भाग अवर्षणग‘स्त म्हणून ओळखला जातो. (अर्थात, अलीकडच्या दोन-चार वर्षांत लहरी पावसाची कृपा या भागावर होऊ लागलेली दिसते.)

या जिल्ह्यातील जैन आणि लिंगायत समाज प्रामु‘याने शेती आणि शेती व्यवसायाशी जोडलेला आहे. विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे जिल्ह्यातला मोठ्या सं‘येने असलेला धनगर समाजही पशुपालनाबरोबर शेती व्यवसायही करतो. कृष्णेसह अन्य नद्यांना पूर आला (अगदी महापूर आला) तरी पुरामधे होड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात आणि अशा शर्यती आयोजित करण्यासाठी मंडळंही असतात. या शर्यतींतलं थ्रिल काठावरून असं‘य लोक अनुभवत असतात. अशा महापुरात सांगलीतल्या पुलावरून उडी मारून पुढे नरसोबाच्या वाडीपर्यंत (६४ कि.मी.) पोहत जाणे, हा छंद जपणारे तरुण आजही दिसून येतात. धनगर समाजाचा उल्लेख झालाच आहे. तर त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांच्या तालावरून रांगडे स्वर, खणखणीत आवाज आणि जोशपूर्ण पदन्यासाने केलं जाणारं जोमदार गजनृत्य! आरेवाडी, ढाळगाव परिसरातल्या अशा चैतन्यपूर्ण गजनृत्याचा समावेश दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचालनात करण्यात आला होता, आणि परदेशातही ते सादर करण्याची संधी त्या कलाकारांना मिळाली होती. व्यंकटेश माडगूळकरांच्या अत्यंत गाजलेल्या ‘बनगरवाडी’ या आधुनिक अभिजात कादंबरीतले लोक आणि परिसर याच भागातला आणि जातिवंत ‘माणदेशी माणसं’ आटपाटी-माडगूळ भागातली. अशा या सांगली जिल्ह्यातील काही ऐतिहासिक घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा, घडामोडी, स्थळमाहात्म्य इत्यादींचा उल्लेख सुरुवातीलाच करणं उचित ठरेल.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा परमोत्कर्ष १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनामधे झाला. ८ ऑगस्ट ४२ला मुंबईला काँग्रेसने ‘छोडो भारत’चा ठराव केला आणि ९ ऑगस्टला महात्मा गांधींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे तीव‘ पडसाद सार्यान देशभर उमटले आणि बि‘टिश सत्तेविरुद्ध प्रचंड असंतोष उफाळून आला. एकसंध सातारा जिल्हाही त्याला अपवाद नव्हता. या जिल्ह्यात निर्माण झालेल्या भूमिगत आंदोलनाने बघता बघता उग‘ रूप धारण केलं. जनसामान्यांतून क्रांतिकारकांची एक फळीच्या फळीच तयार झाली आणि बि‘टिश सत्तेला त्यांनी सळो की पळो करून सोडलं. या क्रांतिकारकांनी ‘प्रति सरकार’ची स्थापना केली, स्वत:चं विधिमंडळ स्थापन केलं; कार्यकारिणी, न्यायमंडळ, संरक्षण दल अशा व्यवस्था निर्माण केल्या. १९४३ ते १९४५ असा हा मंतरलेल्या दिवसांचा तेजस्वी कालखंड होता. जनसामान्यांनीही या भूमिगत लढ्याला मन:पूर्वक पाठिंबा दिला होता. आजच्या सांगली जिल्ह्यात समाविष्ट केलेल्या वाळवा, इस्लामपूर, शिराळा, तासगाव, कुंडल, भिलवडी, किर्लोस्करवाडी अशा भागांतून या भूमिगत आंदोलनाने एक उज्ज्वल इतिहास निर्माण केला. कुंडलचे जी. डी. बापू लाड, वाळव्याचे नागनाथ अण्णा नाईकवडी, येडेनिपाणीचे पांडू मास्तर, येडेमच्छिंद्रचे क्रांतिसिंह नाना पाटील, वाटेगावचे बर्डे गुरुजी, यांच्यासह बाबूराव चरणकर, धोंडीराम माळी, नाथाजी लाड, गौरीहर सिंहासने, बाबूजी पाटणकर, जोशीकाका अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या अभिनव क्रांतिकार्यातून बि‘टिश सत्तेविरुद्ध दहशत निर्माण केली. गनिमी कौशल्याने आंदोलनं केली. रेल्वेचे घातपात, टेलिफोन व टेलिफोनच्या तारा उद्ध्वस्त केल्या, पोस्टसेवा विस्कळीत केली, सरकारी इमारती जाळल्या, पे-स्पेशल ट्रेन जाळली, शेणोली स्टेशन जाळलं, चरणची चावडी लुटली, शिराळ्याला प्रति सरकारचा प्रयोग राबवला. या देशभक्तीने पेटून उठलेल्या आणि जिवावर उदार झालेल्या अशा क्रांतिकारकांच्या कार्यात या भागातले जनसामान्यही मोठ्या सं‘येने आणि धैर्याने सहभागी झाले होते. तासगाव, इस्लामपूर अशा ठिकाणी काढण्यात आलेल्या निषेधमोर्च्यात हजारोंच्या संख्येने लोक सामील झाले होते. इस्लामपूरच्या मोर्च्यात किर्लोस्करवाडीचा पांडे नावाचा इंजिनियर सहभागी झाला होता, त्याला डी.एस.पी.ने विचारलं, ‘‘तुम्हाला काय हवंय?’’ तेव्हा न भिता तो उत्तरला, ‘‘स्वराज्य!’’ आणि मग ‘हे घे स्वराज्य’ म्हणून डीएसपीने त्याच्यावर गोळी झाडली व त्याला ठार मारलं. अशा क्रांतिकार्यात सहभागी झालेले पदमाळेचे तरुण वसंतदादा पाटील यांना २२ जून १९४३ ला अटक करून सांगलीच्या केंद्रीय तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. दादांनी तिथल्या सहकार्यांकच्या मदतीने तुरुंग फोडून पळून जाण्याचा कट रचला आणि २४ जुलै १९४३ला दुपारी तीनच्या दरम्यान तुरुंग फोडून पलायन केलं. अण्णा पत्रावळे त्यांच्या समवेत होते. त्यांच्यावर गोळीबार होत होता, त्यात पत्रावळे यांना मृत्यू आला. दादांनाही गोळी चाटून गेली; पण जिवावर उदार होऊन कृष्णा-वारणेच्या पुरातून पोहत जाऊन दादांनी पैलतीर गाठला. (‘ग्रेट एस्केप’ किंवा ‘वन दॅट गॉट अवे’सारख्या थरारक चित्रपटांची आठवण करून देणारी कथा दादांच्या या पलायनात दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातले एक कर्तबगार नेते म्हणून दादांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा राजकारणात व समाजकारणात निर्माण केली हे आपण जाणतोच.) क्रांतिकारकांनी स्थापन केलेल्या ‘प्रति सरकार’ने बि‘टिशांचं राज्य जवळजवळ साडेतीन वर्षं हद्दपार केलं होतं. या सरकारच्या आणि क्रांतिकार्याच्या विरोधात गद्दारी करणार्यांीच्या पायांत पत्र्याचे खिळे ठोकण्याची शिक्षा दिली जायची. म्हणून या प्रति सरकारला ‘पत्री सरकार’ असंही म्हटलं गेलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासातील सांगली जिल्ह्यातील हा कालखंड म्हणजे मौल्यवान स्थानिक ठेवा होय. इतिहास मीमांसेच्या आजच्या परिभाषेत बोलायचं, तर ‘सबाल्टर्न’ पद्धतीने लिहायच्या इतिहासाचं हे एक उत्तम उदाहरण असून सांगली जिल्ह्याचा अभिमानबिंदू म्हणून त्याचा उल्लेख करता येईल.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबरोबरच पहिलेपणाचा मान मिळवणार्यां आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या काही गोष्टी : अर्वाचीन मराठी रंगभूमीवरचं ‘सीता स्वयंवर’ हे पहिलं नाटक विष्णुदास भावे यांनी रचलं आणि सांगलीमधे ५ नोव्हेंबर १८४३ या दिवशी सादर केलं. त्यामुळे सांगलीला ‘नाट्यपंढरी’ म्हणून ओळखलं जातं आणि ५ नोव्हेंबर हा दिवस ‘रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठी रंगभूमीला योगदान केलेल्या रंगकर्मींचा ‘विष्णुदास भावे सुवर्णपदक’ देऊन समारंभपूर्वक गौरव केला जातो.

जगातील पहिली ‘कैद्यांची मुक्त वसाहत’ औंधच्या पंत प्रतिनिधींनी आटपाडीजवळ ‘स्वतंत्रपूर’ इथे १९३९ साली स्थापन केली. हा एक सर्वस्वी नवा आणि अभिनव प्रयोग होता. कैद्यांना कायमचं गुन्हेगार म्हणून बहिष्कृत न करता त्यांच्यावर माणूसपणाचे संस्कार घडवणं आणि त्यांना विधायक कामात कार्यशील बनवणं, अशा उदात्त हेतूने हा प्रयोग सुरू करण्यात आला, आणि आजही तो सुरू आहे. ‘दो आँखे बारह हाथ’ हा व्ही. शांताराम यांचा अजरामर सिनेमा याच प्रयोगाच्या प्रेरणेतून निर्माण झाला.

देशातली पहिली ‘औद्योगिक वसाहत’ कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली कुंडल-पलुसच्या परिसरात वसवली आणि पुढे ती ‘किर्लोस्करवाडी’ या नावाने ख्यातकीर्त झाली. शंभर वर्षांमागे बेळगावला छोटासा उद्योग करणार्याक लक्ष्मणरावांना (आणि त्यांच्या बंधूंना) काही कारणाने विस्थापित व्हावं लागलं, तेव्हा औंधच्या पंत प्रतिनिधींनी त्यांच्या ताब्यात असलेल्या कुंडलजवळचं माळरान देऊ केलं; आणि लक्ष्मणरावांनी त्याचा स्वीकार केला. काटेकुटे, निवडुंग आणि दगडधोंड्यांनी भरलेल्या त्या माळावर पत्र्याची एक छोटीशी शेड बांधून लक्ष्मणरावांनी आपल्या उद्योगाचा कार्यारंभ केला आणि बघता बघता या माळाचं एका कारखान्यात आणि सुंदर औद्योगिक वसाहतीत रूपांतर झालं. लोखंडी नांगराच्या निर्मितीतून सुरू झालेला इथला कारखाना आज देशाच्या कृषी उद्योगाचा विकास करणार्यान सुविधा पुरवणारा, एवढंच नव्हे, तर विदेशांतही आपली यंत्रं निर्यात करणारा एक अत्याधुनिक कारखाना म्हणून जगवि‘यात झाला आहे. इथल्या कारखान्यात काम करणार्यां साठी सुंदर आणि टुमदार घरांची वसाहत निर्माण करण्यात आली. बागबगीच्यांनी आणि वृक्षलतांनी त्यात सौंदर्य निर्माण केलं. कर्मचार्यांकची मुलं शाळेत शिकू लागली, प्रशस्त क्रीडांगणावर खेळू लागली. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व सुविधा पुरवण्यात आल्या. त्यांच्यावर लक्ष्मणरावांनी सहजीवनाचे, परस्पर बंधुभावाचे, श्रमप‘तिष्ठेचे संस्कार केले. कारखान्याची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘किर्लोस्कर खबर’चं पुढे ‘किर्लोस्कर’ मासिकात रूपांतर झालं. त्यात मग ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ मासिकांची भर पडली. लक्ष्मणरावांचे सहकारी आणि या मासिकांचे आद्य संस्थापक-संपादक शंकरराव किर्लोस्कर यांनी या मासिकांतून अवघ्या महाराष्ट्राची वैचारिक निगराणी केली. महाराष्ट्रातल्या नव्या मध्यमवर्गावर आधुनिकतेचे, उद्योग-उन्नतीचे आणि साहित्य-संस्कृतीचे संस्कार अखंडपणे करण्याचं अत्यंत मोलाचं काम कै. शंकररावांनी या मासिकाद्वारे केलं. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व नामवंत लेखकांचं साहित्य त्यातून घरोघरी पोहोचलं. किर्लोस्करवाडीत राहणार्यार लोकांना हे लेखक आणि अनेक कलावंत प्रत्यक्ष पाहायला आणि ऐकायला मिळाले. नवमहाराष्ट्राच्या प्रबोधनात किर्लोस्कर आणि स्त्री मासिकाने बजावलेली कामगिरी किर्लोस्कर कारखान्यातल्या यंत्रांइतकीच मोलाची ठरली. लक्ष्मणराव, शंकरराव आणि त्यांच्या सहकार्यांानी स्वत:चा कारखाना तर यशस्वी केलाच, पण त्याचबरोबर पंचक्रोशीतल्या तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा दिली, मदत केली, सहकार्य केलं. आज वाडीच्या अवतीभवतीच्या ग्रामीण भागात अनेक छोटे-मोठे कारखाने सुरू असलेले दिसतात, त्यातून लोकांना रोजगार मिळताना दिसतो, त्याचं श्रेय निश्चितच किर्लोस्करवाडी आणि लक्ष्मणराव आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील शंतनुरावांच्या दूरदृष्टीस द्यायला हवं. ग्रामीण भागाच्या औद्योगिक विकासाचं एक रोल मॉडेल म्हणून किर्लोस्करवाडीतील कारखान्याकडे बघता येईल.

मुद्रणसंस्कृतीच्या मुहूर्तमेढीचंही सांगली-मिरजेशी नातं आहे. नाना फडणीसांच्याकडे काम करणारे कारागीर पेशवाईच्या उतरत्या काळात मिरजेच्या पटवर्धन सरकारांकडे आश्रयाला आले आणि त्यांनी नागरी लिपीतले मराठीतले पहिले ठसे तयार केले आणि त्यावर १८०५ साली ‘भगवत्‌गीता’ हा ग्रंथ पहिल्यांदा छापला गेला. त्यामुळे मुद्रणसंस्कृतीची सुरुवात मिरजेपासून झाली, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

अंकलखोपचे विष्णुपंत छत्रे हे भारतीय सर्कशीचे आद्यपुरुष होत. देशभरात त्यांनी सर्कशीचे खेळ केले. विष्णुपंतांना शास्त्रीय संगीताचीही आवड होती. त्यातूनच त्यांनी भूगंधर्व रहिमतखॉं या अवलिया गायकास आश्रय दिला. त्यानंतर सांगलीच्या सदाशिवराव कार्लेकरांनी आणि म्हैशाळच्या देवलांनी सर्कशीच्या क्षेत्रात उदंड यश मिळवलं.देशातली पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ मिरजेच्या ‘वानलेस हॉस्पिटल’मधे करण्यात आली आणि देशातल्या वैद्यकीय क्षेत्रातलं पुढचं पाऊल पडलं.

आजच्या सांगलीची चर्चा निघाली की पहिल्यांदा उल्लेख होतो तो तासगावच्या द्राक्षांचा. खरं तर तासगाव हे परशुराम भाऊ पटवर्धनांचं एक छोटंसं संस्थान. ते ‘सर्कशीचं तासगाव’ म्हणून एके काळी ओळखलं जायचं. आता द्राक्ष बागायतांचा परिसर म्हणून महाराष्ट्रात ते ओळखलं जातं. हे कसं घडलं? चाळीस-पन्नास वर्षांमागे शेतीतज्ज्ञ प्र. शं. ठाकूर, श्रीपाद तथा मुकुंदराव दाभोळकर, प्रयोगशील शेतकरी वसंतराव आर्वेअण्णा आणि आबा म्हेत्रे एकत्र आले आणि शेतीमधे नवे प्रयोग करण्याच्या ध्यासातून त्यांनी ‘प्रयोग परिवार’ ही संकल्पना राबवायला सुरुवात केली. परिसरातल्या शेतकर्यां्ना शेतीचं आधुनिक ज्ञान देऊन त्यांच्यामधे प्रयोगशीलतेचे संस्कार करणं, हा त्यांचा हेतू होता. या परिसरात द्राक्षाची लागवड करता येईल असं कुणालाच वाटत नसतानाही त्यांनी हा आत्मविश्वास शेतकर्यां त ‘वैज्ञानिक द्राक्षकुल’मार्फत निर्माण केला आणि तासगावच्या माळरानावर द्राक्षबागा डोलू लागल्या. ज्योतीने ज्योत पेटावी तसे मग एकामागून एक शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळू लागले. त्यांना म्हेत्रे, आर्वे, ठाकूर आणि दाभोळकरांनी सतत मार्गदर्शन केलं, नवनवीन ज्ञान दिलं, त्यांचं प्रबोधन केलं, त्यांच्यात प्रयोगशीलता रुजवली. त्यातून अशा शेतकर्यां्चा परिवार तयार झाला, आणि मग झाली एक अभूतपूर्व द्राक्षक्रांती! या क्रांतीचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपर्यां त पोहोचले. तासगावबरोबरच सांगली जिल्ह्यातल्या मणेराजुरी, मालगाव, बेडग, म्हैशाळ अशा ग‘ामीण भागांतून पारंपरिक शेतीऐवजी द्राक्ष बागाईत निर्माण होऊ लागली. आता तासगावसह सांगली जिल्हा द्राक्ष बागायतीच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील एक आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ‘तास-ए-गणेश’ ही द्राक्षाची विशिष्ट जात तासगावच्या प्रयोगशीलतेचं फलित म्हणून निर्माण झाली. तिच्या विशिष्ट आकारामुळे आणि चवीमुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. इथली द्राक्षं आता देशातल्या सर्व बाजारपेठांबरोबरच विदेशांतही विक्रीसाठी जातात. पूरक उद्योग म्हणून त्यांच्यातून बेदाणे तयार करण्याच्या आणि वाइन निर्माण करण्याच्या प्रयत्नांनाही चांगलं यश मिळालेलं दिसतं. तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक आणि भूमिपूत्र एकत्र आले तर कसा चमत्कार होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे तासगावच्या माळावर झालेली द्राक्षक्रांती. द्राक्ष लागवडीमधे पुढाकार घेणार्यास वीरशैव माळी समाजातील शेतकर्यांकमुळे ‘मळ्यात द्राक्षं आणि गळ्यात रुद्राक्ष’ अशी नवी म्हणही इकडे प‘चलित झालेली दिसते.जत तालुका हा सांगली जिल्ह्याच्या अति पूर्वेकडचा भाग. सांगलीपेक्षाही कर्नाटकातल्या विजापूरला जवळचा. या तालुक्यावर भाषेसह एकूणच कर्नाटकाचा प्रभाव आणि संस्कार. त्यामुळे इकडे लोक ‘जत जिंकेल तो जग जिंकेल’ असं म्हणतात. तसा हा अवर्षणग्रस्त आणि दुष्काळी भाग; पण आता इथल्या शेतकर्यांिनी डाळिंबाच्या लागवडीकडे विशेष लक्ष दिलेलं दिसतं, आणि त्यात ते यशस्वीही होताना दिसतात. या भागात धनगर समाज मोठ्या सं‘येने असल्याने पशुपालनही मोठ्या प्रमाणात दिसतं.

इथे तालुक्यातालुक्यांची म्हणून काही खास वैशिष्ट्यं आहेत. तासगावसह विटा आणि खानापूर तालुक्यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथून स्थलांतरित झालेले आणि आंध्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूसह अगदी उत्तरेस दिल्लीपर्यंत हमखास आढळून येणारे सोने गाळण्याचा व्यवसाय करणारे लोक. त्यांना ‘गलाई कामगार’ असं म्हणतात. काही पिढ्यांमागे पोटापाण्याच्या विवंचनेत हे लोक बाहेर पडले, सोन्याच्या व्यवसायात उतरले. त्यामधे त्यांनी कौशल्य प्राप्त केलं आणि त्यात ते स्थिरावले, त्या त्या भागाशी एकरूप होऊन गेले; घरात मराठी आणि बाहेर त्या त्या प्रदेशाची भाषा, असे द्विभाषक झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्याही हा व्यवसाय करू लागल्या. या व्यवयासात त्यांनी चांगली प्रतिष्ठा आणि धन कमावलं, मात्र आपल्या मूळ गावांना ते विसरले नाहीत. आपल्या गावात त्यांनी चांगली घरं बांधली आणि वर्षातून अधूनमधून गावात येऊन आपले गावाशी असलेले संबंध कायम राखले. सांगली जिल्ह्याचं नाव अवघ्या देशाच्या कानाकोपर्यां त नेणारे हे लोक म्हणजे जिल्ह्याचे अग्रदूतच होत!

सांगलीतल्या शिराळा तालुक्यात पावसाचं प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भातशेती होते. इथल्या सुवासिक आणि चवदार तांदळाला ग्राहकांची पसंती मोठ्या प्रमाणावर असते. भारतातलं सर्वांत मोठं असलेले मातीचं चांदोली धरण आणि चांदोली अभयारण्य शिराळा तालुक्यातलेच. पण शिराळा म्हटलं की लक्षात येते ती इथली सुप्रसिद्ध नागपंचमी. या सणाच्या अगोदर काही दिवस इथले तरुण (त्यांची मंडळं असतात) आसपासच्या परिसरातून जिवंत नाग पकडतात, त्यांना विशिष्ट पद्धतीने गाडग्यांमधे बंद करून ठेवतात, मग पंचमीच्या दिवशी त्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते, त्यांची पूजा केली जाते आणि मग असे सारे नाग सर्वांसाठी खुले होतात. स्थानिक लोकांबरोबरच ही नागदृश्यं पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी देश-विदेशांतले अक्षरश: हजारो लोक या लोकोत्सवात सहभागी होत असतात. नागपंचमीच्या उत्सवानंतर त्यांना पुन्हा सन्मानपूर्वक त्यांच्या मूळ जागी सोडलं जातं. (शिवाजीराव नाईक आणि जयंतराव पाटील यांच्यातल्या राजकीय वादंगांचा उल्लेख इकडचे वृत्तपत्रकार ‘शिराळ्याचा नाग आणि इस्लामपूरचा वाघ’ असा करीत असतात.) शिराळ्याचा परिसर डोंगरदर्यांलचा, झाडाझुडपांचा आणि निसर्गरम्य, तर तळाशी असलेला इस्लामपूर- वाळव्याचा भाग शेती-शिवारांनी समृद्ध आणि संपन्न, कृष्णा-वारणेचं पाणी प्यायलेल्या उसाच्या शेतीत बहरलेला. एका बाजूला मातंग, बेरड यांच्या दहशतीबद्दल, तर दुसर्याड बाजूला स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या देशभक्तीमुळे प्रसिद्ध असलेला. तालुका हिरवागार, पण नाव मात्र वाळवा! ‘हिंमत असेल तर आम्हाला वाळवा’ असं इथले लोक म्हणतात. आव्हान देणं आणि आव्हान घेणं हा इथल्या लोकांचा स्वभाव. लोकनेते राजारामबापू पाटील यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासाचं बीजारोपण केलं. कासेगाव शिक्षणसंस्थेमार्फत या परिसरात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या संस्था काढल्या. सहकारी साखर कारखाना सुरू करून सहकारातून समृद्धीचा मार्ग दाखवला. सहकारी बँक स्थापून अर्थव्यवहाराला गती दिली. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करून आधुनिक शिक्षण उपलब्ध करून दिलं. सहकारी दूध संघाची स्थापना केली. राजारामबापूंच्या नंतर या संस्थांचं नेतृत्व सध्या जयंतराव पाटील करीत आहेत. त्यांनी या संस्थांत नव्या संस्थांची भर घातली आहे आणि या संस्थांचं व्यवस्थापन आधुनिक दृष्टीने उत्तम स्वरूपात होत राहील हे पाहिलं आहे.

जशी सांगलीतली शेती वेगळी, तालुके वैशिष्ट्यपूर्ण तसेच इथले काही उत्सवही खास. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वत्र भरतात तशा वार्षिक जत्रा सांगली जिल्ह्यातल्या गावागावांतून भरत असतात, आणि अजूनही त्यातला लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. पण आष्ट्याच्या ‘भवई’ या लोकोत्सवाचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. ‘भवई’ ही ‘भूतमात्र’ लोकदेवता आहे, तिचं स्वरूप व कार्य पीडानाशक मानलं जातं, आणि म्हणून तिचं सांत्वन आणि समाधान करण्याच्या हेतूने सर्व लोकांच्या सहभागातून हा उत्सव केला जातो. तिची पालखी सर्व जातींच्या मानकर्यांयच्या दारात जाते. तिची पूजा, उपचार, उपासना केली जाते. शेवटी ही पालखी महारवाड्यात जाते. तिथला घुगर्यांूचा प्रसाद सर्वजण ग‘हण करतात. तिचं नाट्यात्मक सादरीकरण ‘विधिनाट्या’चं दर्शन घडवतं. उत्सवाची सुरुवात दिवा उत्सवाने होते. बारा बलुतेदार हातात कंकण बांधून प्रतिज्ञा करतात. त्याला ‘कंकण विधी’ म्हणतात. नंतर देवी आळूमाळू, पिसे, जोगव्या आणि मुखवटे अशी निरनिराळी रूपं घेऊन पाच दिवस, पाच रात्री दैत्याचा शोध घेते. शेवटी युद्धात दैत्य शरण येतो. अशी ही कथा खेळगडी सादर करतात. ढोलताशा अशा वाद्यांचा गजर होत असतो. सर्व ग्रामजन यात सहभागी होतात. एका व्यक्तीने ‘भवई’चं रूप धारण केलेलं असतं. तिच्या हातात सूप आणि झाडू असतो. ती गावात सर्वत्र फिरते. तिच्याकडच्या घुगर्यात घातलेल्या खोबर्याूच्या वाट्या पळवणारा इसम त्या उत्सवातला हीरो ठरतो.

आरेवाडीचा बिरोबा हा धनगर समाजाचा देव. त्याच्या वार्षिक जत्रेच्या वेळी महाराष्ट्रासह आंध‘ आणि कर्नाटकातले हजारो धनगर हजेरी लावतात आणि त्यांनी उधळलेल्या भंडार्यातने आणि वाद्यवादनाने आणि उच्चारलेल्या ‘चांगभलं’ने अवघा आसमंत भारून गेलेला असतो. आटपाडी तालुक्यातील ‘करगणी’ या छोट्या गावामधे ‘लखमेश्वतर’ हे मंदीर आहे. उत्तर कर्नाटकातून स्थलांतरीत झालेल्या गवळी धनगर या पशु पालकांच्या श्रद्धा आणि संस्कृतीचा वेध घेण्याच्या दृष्टीने त्याला संदर्भमूल्य आहे. महाशिवरात्रीपासून १५ दिवस इथे मोठी जत्रा भरते. शेळ्या-मेंढ्या, गाई-बैल यांचा मोठा बाजार या काळात भरतो. घागरींची खरेदी-विक्री होते. या जत्रेत ‘मूल उधळणे’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण विधी होत असतो. मंदिराच्या कळसावरून लहान मुलाला खाली टाकलं जातं आणि खाली ते झेललं जातं. देवाच्या आशीर्वादासाठी हा विधी केला जातो. मालगाव, कडेगाव, मिरज, नांद्रे इथले ऊरूस मुस्लिमधर्मीयांचे असले तरी त्यामधे सर्वधर्मीय लोक मोठ्या सं‘येने आणि श्रद्धेने सहभागी झालेले असतात. नवरात्रामधे मिरजेला होणार्याय अंबाबाईच्या उत्सवात आणि त्या निमित्ताने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवाच्या आयोजनात मुस्लिम कार्यकर्तेही सहभागी झालेले असतात.

मीरासाहेब या सूफी संताचा उरूस इथे गेली सातशे वर्षं अखंडपणे चालू आहे. उरसामधे मीरासाहेबांच्या समाधीवर पहिला गलोफ चढविण्याचा मान चांभार समाजाचा असतो. वाजत-गाजत हा गलोफ आणला जातो. (या मिरवणुकीच्या अग्रभागी ‘यातनाम संगीतकार राम कदम वाद्य वाजवत असत.) उरसामधे ईप्सित फलप्राप्ती होते, या श्रद्धेने नवस बोलले जातात. मालगावला ज्यांचा उरूस होतो ते संत बाबा फरीद हे सम्राट अकबराचे एक गुरू होते असं म्हणतात. पुढे ते दक्षिणेकडे धर्मोपदेश करत करत मिरजेजवळच्या मालगावला आले आणि तिथेच त्यांनी यथाकाल समाधी घेतली. इथला उरूसही सर्वधर्मीयांच्या सहभागाने होतो. सांगली जिल्ह्यातील लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारी ही काही उदाहरणं.

साधारण पासष्ट-सहासष्ट वर्षांमागे कृष्णाकाठच्या (आणि दत्ताचं पवित्रस्थान असलेल्या) औदुंबरला कवी सुधांशू आणि कथाकार म. बा. भोसले यांनी मकरसंक्रांतीदिवशी महाराष्ट्रातलं ‘पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन’ भरवलं. त्याचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय द. वा. पोतदार. तेव्हापासून सातत्याने दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी हे संमेलन अत्यंत उत्साहात भरवलं जातं. कसलंही राजकारण आणि निवडणूक न घेता या संमेलनासाठी अध्यक्षांना आमंत्रित केलं जातं. आतापर्यंत द. वा. पोतदारांपासून ते नामदेव ढसाळांपर्यंत अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक, कवी, समीक्षक आणि विचारवंत या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. यामध्ये तिथल्या स्थानिक साहित्यिकांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं, आणि त्यांना ऐकायला पंचक्रोशीतला श्रोतृवर्ग मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने येत राहिला आहे. आता अशी ग्रामीण साहित्य संमेलनं विटा, शिराळा, पलुस, इस्लामपूर, जत अशा सांगलीच्या ग्रामीण भागांतही भरवली जातात. नव्या काळातले साहित्योत्सव म्हणून त्यांचं स्वागत करावंसं वाटतं.

सांगलीविषयी सांगताना मिरजेबद्दलही बोलायला हवं. कारण मिरज आणि सांगली म्हणजे जिल्ह्याचे दोन डोळे. शिलाहार राजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचा उल्लेख ‘मिरींच’ असा सापडतो. त्याचंच पुढे ‘मिरज’ झालं असावं असं म्हणतात. मिरज हे आदिलशाहीचं प्रवेशद्वार होतं. काही काळानंतर ती पटवर्धनांची जहागिरी झाली. ‘सांगली’ या नावाची उत्पत्ती विविध प्रकारे सांगतात. मूळच्या सहा गल्ल्यांचं गाव म्हणून सांगली, कृष्णा-वारणेच्या संगमाचं गाव म्हणून सांगली, मूळच्या ‘संगळगी’ या कानडी नावाचा अपभ्रंश होऊन सांगली इ. मिरज जहागिरीतून फुटून बाहेर पडलेल्या थोरल्या चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली हे वेगळं राज्य बनवलं, तेव्हापासून मिरज आणि सांगली ही दोन स्वतंत्र संस्थानं झाली. दोन्हीकडचे संस्थानिक प्रजाहितदक्ष असल्याने प्रजेच्या कल्याणासाठी ते कार्यरत राहिले. पुढे भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक अशा विविध कारणांनी मिरज आणि सांगली यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. दहा वर्षांमागे सांगली-मिरज आणि कुपवाड ही महानगरपालिका अस्तित्वात आली असून आता तिच्यामार्फत या शहरांचा प्रशासकीय कारभार पाहिला जातो.

मिरजेमधे हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचे लोक राहतात, त्यामुळे इथली लोकसंस्कृती संमिश्र स्वरूपाची दिसून येते. भारतीय शास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा आणि लोकमान्यता मिळवून देण्याचं कार्य संपूर्ण भारतात केलेले पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. विष्णू दिगंबर पलुसकर, विनायकबुवा पटवर्धन, नीलकंठबुवा जंगम यांची मिरज ही कर्मभूमी. आजही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं प्रमुख कार्यालय मिरजेतच आहे. ‘किराना’ घराण्याचे आद्य संस्थापक अब्दुल करीम खॉं यांचीही मिरज हीच कर्मभूमी. त्यांनी मिरजेत चाळीस वर्षं वास्तव्य केलं. १८९८ला मिरजेत आल्यानंतर त्यांना प्लेगचा आजार झाला, तेव्हा इथल्या मीरासाहेबांच्या दर्ग्यात त्यांनी आपली गानसेवा अर्पण केली. त्यानंतर ते लगेचच बरे झाले. त्यानंतर मीरासाहेबांच्या प्रत्येक वार्षिक उरुसात त्यांनी आपली हजेरी लावली. ज्या चिंचेच्या झाडाखाली बसून त्यांनी गायनं केली तिथे आता दरवर्षी मीरासाहेबांच्या उरसात संगीत महोत्सव केला जातो आणि किराना घराण्यासह अन्य घराण्यांचे गायकही तिथे भक्तिभावाने आपली गानसेवा सादर करतात. सतार, तंबोरा, संवादिनीसह सर्व प्रकारच्या तंतुवाद्यांची निर्मिती इथे १८५० पासून होत आली असून, देशातल्या नामवंत गायकां-वादकांसह ती विदेशांतही नेली जातात. मिरजेमधे ‘सतारमेकर गल्ली ही एक गल्लीच्या गल्ली तंतुवाद्यांच्या दुकानांनी भरून गेलेली दिसते आणि अशा वाद्यांच्या निर्मितीमधे अनेक कारागीर गुंगून गेलेले दिसतात.

मिरज हे पश्चिनम महाराष्ट्रातलं एक प्रमुख वैद्यकीय केंद्र म्हणून ओळखलं जातं. मिरजेचे संस्थानिक गंगाधरपंत पटवर्धन यांनी या क्षेत्राला उत्तेजन दिलं होतंच. पण १८१२मध्ये अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वानलेस यांनी पाश्चात्त्य उपचार पद्धती सुरू केली आणि १८९४ साली मिशन हॉस्पिटलची स्थापना केली. त्याचबरोबर टी.बी.सॅनिटोरियम, रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, मिरज मेडिकल स्कूल अशा संस्था सुरू केल्या. डॉ. वानलेस यांनी वैद्यकीय सेवेचं बीजारोपण केलं. त्यानंतर आलेल्या त्यांच्या सेवाभावी सहकार्यां नी त्याचा विस्तार केला. मिशन हॉस्पिटलला आता शंभर वर्षं होऊन गेली आहेत. आता सर्व तर्हेचच्या आजारांवरचे अद्ययावत उपचार इथल्या विविध दवाखान्यांतून होत असतात. मिरजेत कुठेही जा, कुठल्याही गल्लीत वा रस्त्यावरून फिरा, जिकडे-तिकडे दवाखानेच दवाखाने पाहायला मिळतील, औषधांची दुकानं दिसून येतील. या सार्याठत नामवंत डॉक्टर कै. डी. के. गोसावी यांच्या अथक प्रयत्नांतून कॅन्सरसार‘या दुर्धर आजारावर अद्ययावत उपचार करणारं भव्य असं ‘सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल’ उभं राहिलं असल्याने अशा रुग्णांचीही या भागात सोय झाली आहे.

साठ-सत्तर वर्षांपेक्षाही अधिक काळ सातत्याने दरवर्षी खरे मंदिराच्या प्रांगणात होणार्या- वसंत व्याख्यानमालेतून इथल्या सुजाण श्रोत्यांना नामवंत वक्त्यांची आणि विचारवंतांची व्याख्यानं ऐकण्याची संधी मिळत आली आहे. दरवर्षी इथे होणार्या मीरासाहेबांच्या उरुसामधे मुसलमानांसह सर्वधर्मीय हजारो भक्त हजेरी लावत असतात. पंडिता रमाबाईंच्या मेधावी या कन्या अमेरिकेत शिकून परत मिरजेत वास्तव्यास आल्या आणि इथेच त्यांचा मृत्यू झाला. इथल्या ख्रिश्चन दफनभूमीत त्यांचं दफन करण्यात आलं. पेशवेकालीन सौंदर्याचा नमुना म्हणून मिरजेच्या कृष्णा नदीवरील घाटाचा आवर्जून उल्लेख करता येईल. १८९७ साली श्रीमंत बाळासाहेबांनी बांधलेल्या ‘हंसप्रभा नाट्यगृहा’मधे किर्लोस्कर आणि गंधर्वयुगातली नाटकं सादर करण्यात येत असत, आणि ती पाहण्यासाठी मिरजेबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूरचे नाट्य आणि संगीतप्रेमी आवर्जून येत असत. हे नाट्यगृह नंतर बंद झालं. आता त्याच्या जागी नव्या बालगंधर्व नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. मिरजेचं राजप्रासादासारखं असलेलं ‘गेस्ट हाऊस’ आता सरकारी गेस्ट हाऊस झालं आहे आणि इथलं रेल्वे स्टेशन दक्षिण भारतातल्या व उत्तरेतल्या सर्व महत्त्वाच्या शहरांना जोडणारं जंक्शन आहे.

जसं मिरज बदललं, तशीच सांगलीही. गृहकलहाला कंटाळून बाहेर पडलेल्या थोरल्या चिंतामणराव पटवर्धनांनी अठराशेच्या सुमारास तोपर्यंत नगण्य असलेल्या सांगलीला आपल्या नव्या जहागिरीची राजधानी बनवलं आणि बघता बघता या नगरीचा कायापालट केला. १८०४-०५ च्या सुमारास ‘गणेशदुर्ग’ या भुईकोट किल्ल्याचं आणि १८११ साली आपल्या कुलदैवताचं, गणपतीचं मंदिर उभारलं. १८५१पर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी सांगलीचा स्वत:चा असा ‘चेहरा’ निर्माण केला. पुढे दुसर्यार चिंतामणराव पटवर्धनांनी आपल्या प्रजाहितदक्ष वृत्तीतून सांगलीमधे कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग अशा क्षेत्रांच्या विकासासाठी सकि‘य प्रोत्साहन दिलं. (कवी साधुदासांनी ‘सांगली बहु चांगली’ असं आनंदाने लिहिलं.) सांगलीमधे व्यापारपेठ वसवली आणि गुजराती, मारवाडी, सिंधी व्यापारी लोकांना आवर्जून या पेठेत आमंत्रित करून स्थान दिलं. संस्थानाचा चेहरा ब्राह्मणी होता; पण बाहेरून आलेले हे सारे लोक त्यात मनापासून सामावून गेले. महाराजांनी ठिकठिकाणी उद्यानं निर्माण केली. साडेतेरा एकरांच्या विस्तीर्ण परिसरात ‘आमराई उद्यान’ स्थापन केलं. त्यामधे शेकडो प्रकारच्या वृक्षांचं रोपण केलं गेलं. आपल्या संस्थानात लोकशाहीचा प्रयोग केला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीला १९१९मधे विलिंग्डन महाविद्यालयाची स्थापना करण्यास मदत केली. त्यांच्याच प्रेरणेतून शिक्षणप्रेमी नागरिकांनी शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी संस्था काढल्या आणि शाळा काढल्या. त्यांच्याच प्रयत्नातून मिरज ते सांगली अशी लोकल रेल्वेगाडी १९०७ साली सुरू झाली (आणि १५ एप्रिल १९७१ला ती बंद झाली. ‘विलिंग्डनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ही गाडी म्हणजे जिवलग मैत्रीणच वाटायची’, अशी आठवण मालतीबाई किर्लोस्कर यांनी या गाडीवर लिहिलेल्या निरोपाच्या लेखात दिली आहे.). त्यांच्याच कारकिर्दीत कृष्णा नदीवर १९२९ साली आयर्विन पूल बांधला गेला. (‘सांगलीचे धनी सरकार| करुनी पुलाचा विचार’ असं एक गाणं त्या वेळच्या महिलावर्गात म्हटलं जायचं.) चिंतामणराव महाराजांबद्दल प्रजेला वाटणारा आदर आणि कृतज्ञता त्यांचा ७१वा वाढदिवस जाहीरपणे साजरा करून आणि त्यांना एक लाख रुपयांची थैली अर्पण करून व्यक्त करण्यात आली. त्यात स्वत:चे एक लाख रुपये घालून राजेसाहेबांनी ही रक्कम डे. ए. सोसायटीकडे सुपूर्त केली, आणि संस्थेने त्यातून राजेसाहेबांच्या नावाने १९६० साली वाणिज्य महाविद्यालयाची स्थापन केली.

स्वातंत्र्योत्तर काळात वसंतदादा पाटील यांचं नेतृत्व उदयाला आलं आणि त्यांनी त्यांच्या विधायक दृष्टीतून, सर्वसमावेशक राजकारणातून, रचनात्मक आणि संस्थात्मक कार्यातून सांगलीचा लौकिक पुढे नेला आणि देशव्यापी केला. तर अशा या सांगलीची सांगायलाच हवीत अशी ही काही वैशिष्ट्यं : एक म्हणजे, अर्वाचीन मराठी रंगभूमीवर सुवर्णकाळ निर्माण करण्यास योगदान देणारे नाटककार गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर सांगलीचे. दुसरं म्हणजे, देशातली सर्वांत मोठी हळद- व्यापार पेठ सांगलीतली. फॉरवर्ड मार्केट कमिशनच्या मान्यतेने इथे हळदीचा वायदा मे, सप्टेंबर आणि डिसेंबरमधे ‘महाजन हॉल’मधे ठरतो. या हॉलला रिंग म्हणतात. कारण लोकल रेल्वेत असतात तशा रिंगा इथे असतात, आणि त्याला धरून बोलींचा व्यवहार जोरजोरात चालतो. हळद साठवून ठेवण्याची खास ‘पेवे’ हरिपूरच्या परिसरात असतात. ‘पेव’ म्हणजे २० फूट खोल, १४ फूट रुंद माठाच्या आकाराचा खड्डा. आजच्या भाषेत ‘कोल्ड स्टोअरेज’. या पेवात हळद खराब न होता जशीच्या तशी राहते. पेव उघडलं की सुरुवातीला विषारी वायू बाहेर जाऊ दिला जातो. आत कंदील सोडून तो टिकला की हळद काढण्याचं काम केलं जातं. अशा तीन-चार हजार पेवांतून सहा-सात लाख क्विंटल हळद साठवलेली असते.

तिसरं म्हणजे, १८८७ साली सांगलीत ‘सदासुख’ हे नाट्यगृह निर्माण झालं आणि त्यामधे बालगंधर्व आणि दीनानाथ मंगेशकरांची नाटकं होत राहिली. दीनानाथरावांनी तर सतत १८ वर्षं या नाट्यगृहात नाटकं केली. पृथ्वीराज कपूरही दरवर्षी आपली नाट्यकंपनी घेऊन सांगलीत येत आणि ‘दीवार’, ‘पैसा’ अशी गाजलेली हिंदी नाटकं सादर करीत. (आणि विशेष म्हणजे या नाट्यदौर्यााच्या शेवटी काही दिवस आणखी मुक्काम करून मैदानावरच्या कुस्तीचा सराव इथल्या तालमीतून करीत असत.) आपल्या ‘बलवंत चित्रपट’ या संस्थेमार्फत मा. दीनानाथ मंगेशकरांनी सांगलीमधे ‘कृष्णार्जुन युद्ध’सारखे चित्रपट निर्माण केले; पण दुर्दैवाने या व्यवसायात त्यांना फार मोठं आर्थिक अपयश आलं. लता, आशा आणि इतर भावंडं यांचं या काळात सांगलीमधे वास्तव्य होतं.

सांगलीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, सांगलीला बुद्धिबळ या खेळाची जवळजवळ १५० वर्षांची परंपरा आहे, आणि पुढच्या काळात क्रीडामहर्षी भाऊसाहेब पडसळगीकर यांनी ही परंपरा नुसती पुढे नेली एवढंच नाही, तर बुद्धिबळाच्या क्षेत्रातील सांगलीचा नावलौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. आपल्या नव्वद वर्षांच्या आयुष्यात शेवटच्या श्वा सापर्यंत या खेळाचाच ध्यास त्यांनी घेतला आणि सांगलीला ‘बुद्धिबळ नगरी’ म्हणून मान मिळवून दिला. अनेक उत्तमोत्तम बुद्धिबळपटू त्यांनी घडवले, बुद्धिबळाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित केल्या. याशिवाय, सांगलीतलं वस्तुसंग्रहालयही वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक जगवि‘यात चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार यांच्या कलाकृती, कोरीव चंदनी वस्तू, ताम‘पट इ. दुर्मिळ गोष्टींचा संग्रह इथं पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे, सांगलीची प्रसिद्ध सराफ बाजारपेठही जुनी. १८३२ साली पु. ना. गाडगीळ या नावाने गाडगीळ सराफांनी सोने-चांदीच्या दागदागिन्यांचा व्यवसाय सुरू केला आणि सचोटी, विश्वारसार्हता आणि कलाकौशल्य या गुणांनी मोठं यश प्राप्त केलं. १९२५ साली ‘सराफ असोसिएशन’ची स्थापना झाली. आज या सराफ पेठेत पंडित, पेडणेकर, जोग, पेंडुरकर, आरवाड, शिखर असे अनेक सराफ या व्यवसायाचा नावलौकिक वाढवत आहेत. ‘सांगली घाटाची चांदीची भांडी’ विशेष प्रसिद्ध आहेत.

इथली खाद्यसंस्कृती प्रामुख्याने ‘शाकाहारी’ स्वरूपाची राहिली आहे. एके काळी आवड-निवड, ग्रीन्स, मधुबन अशी हॉटेल्स सुग्रास शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध होती. आता कालौघात पंजाबी, गुजराती, सामिष पद्धतीचं भोजन देणारी हॉटेल्सही निर्माण झाली आहेत. सांगलीच्या चवदार आणि खमंग भडंगाचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. त्यात पुन्हा गोरे, भोरे, कपाळे, दांडेकर यांचे भडंग विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आणि मित्रांना हे भडंग आवर्जून खायला देणं व भेट देणं इथल्या आदरातिथ्याचा भाग आहे. इथल्या लिंगायत खानावळीत मिळणार्याट भाजी, भाकरी, मटकीची उसळ, पिठलं आणि झणझणीत खर्ड्याचा आस्वादही खाद्यप्रेमी आवर्जून घेत असतात. कृष्णाकाठची वांगी विशेष प्रसिद्ध आहेत.

गणपती हे इथलं ग्रामदैवत. विशेष म्हणजे हिंदुधर्मीयांबरोबरच अन्य धर्मांचे लोकही गणपतीची भक्तिभावाने उपासना करतात, संकष्टीला उपवास करतात (आवर्जून मोदक करतात.), सार्वजनिक गणेशोत्सवात आनंदाने सहभागी होतात.

इथल्या लोकांच्या मराठी भाषेमधे कानडीचं वळणही आढळून येतं. उदाहरणार्थ, ‘दार उघड’ या अर्थाने ‘दार काढ’, किंवा ‘दिवा मालव’ या अर्थाने ‘दिवा काढ’ म्हणणं. त्याशिवाय इथल्या म्हणूनही काही लकबी मराठी बोलण्यात आढळतात. उदाहरणार्थ, ‘ठीक आहे’ अशा अर्थाने ‘चालतंय की’ असं म्हणणं, किंवा ‘हो’च्या ऐवजी ‘होय,होय’ असं जोर देऊन म्हणणं. (श्री. दा. पानवलकरांच्या अत्यंत गाजलेल्या ‘सूर्य’ या कथेतला बाप मुलाने ‘हो’ म्हटल्यावर ‘कानफाटात मारीन’ म्हणतो व त्याऐवजी ‘होय’ म्हण असं सांगतो. पानवलकरांच्या सांगलीसंबंधी असलेल्या अनेक कथांतून इथल्या शैलीत बोलल्या जाणार्याण मराठीचं प्राचुर्याने दर्शन घडतं.) ‘जातो’ ऐवजी ‘जातो की’, ‘करतो’ ऐवजी ‘करतो की’ म्हणणं, अशा काही गोष्टी या संदर्भाने नोंदवता येतील.

अर्थात आता अन्य शहरांप्रमाणेच सांगलीमधेही झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. गावभागातले ‘वाडे’ जाऊन त्या जागी अपार्टमेंट्‌स आली आहेत. जुनी चित्रपटगृहं हळूहळू बंद पडत असून नवी मल्टिप्लेक्स येत आहेत. छोट्या-मोठ्या दुकानांच्या ऐवजी ‘बिग बझार’, ‘डी-मार्ट’मधून खरेदी करण्याकडे वाढता कल आहे. मॉल संस्कृती रुजू लागली आहे. मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना घालण्याकडे नवमाध्यमवर्गीय पालकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याही वाढू लागली आहे. रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ वाहते आहे. समारंभप्रियता वाढते आहे. धार्मिक-कौटुंबिक समारंभ सिनेमॅटिक पद्धतीचे, झगमगाटाचे होत आहेत. तरुण-तरुणींच्या पोषाखपद्धती आधुनिक स्वरूपाच्या झाल्या आहेत. जाहिरातबाजीला महत्त्व आलं आहे आणि डिजिटल पोस्टर्सनी अवघं शहर व्यापून आणि ग्रासून टाकलं आहे.

तर एकुणात सांगली जिल्ह्यासंबंधी सांगण्यासारख्या या काही गोष्टी. त्याचबरोबर त्यात उणिवाही खूप आहेत. त्यातल्या काहींचा उल्लेख करावासा वाटतो.

या परिसरात पुरेसं औद्योगीकरण झालेलं नाही. सांगावेत असे मोठे कारखाने नाहीत. त्यामुळे त्यांना पूरक असणारी लघुकारखानदारीही जोमाने वाढताना दिसत नाही. सहकारक्षेत्रात आणि त्यातून निर्माण झालेल्या सहकारी संस्थांत आणि उद्योगांत मरगळ आली आहे. जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांत सहकारी साखर कारखाने आहेत; पण काहींचा अपवाद करता ते बंद पडले आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. (कै. वसंतदादा पाटील यांनी सहकार्यां च्या मदतीने सुरू केलेला आणि आशिया खंडातील सर्वांत मोठी गाळप क्षमता असणारा सहकारी साखर कारखानाही सध्या बदंच आहे.) जिल्ह्यातले रस्ते, पाणी आणि आरोग्यव्यवस्था समाधानकारक नाही. जिल्ह्यामधे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे आणि गुन्हेगारांना राजकीय पक्षांचा आश्रय मिळतो आहे. इथले हुशार तरुण मोठ्या संख्येने बाहेर (पुण्या-मुंबईकडे) जात आहेत, त्यांना इथेच राहावं असं वाटावं अशी संधी आणि वातावरण मिळत नसल्याचा हा परिणाम आहे. जिल्ह्यात राजकारण खूप आहे. राजकीय नेतेही खूप आहेत, पण त्यांच्यात राजकीय इच्छाशक्तींचा अभाव आहे. जिल्ह्याच्या विकासकार्यात आपापसातले मतभेद विसरावेत, जिल्ह्यात नवनवीन योजना आणाव्यात, विकास प्रकल्प आणावेत यासाठी म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत. श्रेयासाठी मात्र जोराने चाललेली धडपड दिसून येते. शिक्षणक्षेत्रात औपचारिक शिक्षणाच्या सुविधा असल्या तरी अद्ययावत अशा नव्या अभ्यासक्रमांचा अभावच आहे. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जापनीज अशा विदेशी भाषा शिकण्याची सोय कुठेही नाही. कृषीक्षेत्रासह कुठल्याही ज्ञानक्षेत्रातल्या ‘राष्ट्रीय संशोधन संस्था’ नाहीत. आजच्या तरुण पिढीला आकर्षित करणारे आय.टी. क्षेत्रातले उद्योग नाहीत. सांगली-मिरजेसह जिल्ह्याच्या भविष्यकालीन विकासाचं प्रारूप निश्चित केलंय आणि त्यावर खुल्या चर्चा होताहेत, सूचना मागवल्या जात आहेत असं दिसत नाही. प्रभावी स्वरूपाच्या सामाजिक/सांस्कृतिक चळवळी दिसत नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशस्त कलादालन (आर्ट गॅलरी) नाही, सर्व सुविधांनी युक्त असं अद्ययावत नाट्यगृह नाही. ताकारी-म्हैशाळसारखी जलसिंचनाच्या क्षेत्रातली महत्त्वाकांक्षी आणि सिंचनाखाली भरपूर जमीन आणणारी योजना अनेक वर्षं रडतखडत चालली आहे, पण ती पूर्णत्वाला जाताना दिसत नाही. वस्तुत: सांगली हा कृषिप्रधान जिल्हा. त्यामुळे कृषी उद्योगांना भरपूर संधी मिळू शकते; पण त्या दृष्टीनेही काही पद्धतशीर प्रयत्न होताना दिसत नाहीत. सबंध जिल्ह्याचा व्यापक दृष्टीने विचार करणारं नेतृत्व या जिल्ह्याने कै. वसंतदादा पाटील यांच्या रूपात प्रत्यक्ष अनुभवलं होतं. त्यांची जागा घेणारं नवं नेतृत्व उदयाला आलंय असंही दिसत नाही. जिल्ह्यात विमानतळ नाही. तो असायला हवा असं सारेच म्हणतात, पण त्यासाठी जोरदार प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीत.

‘कायदा पाळा गतीचा| काळ मागे लागला| थांबला तो संपला| धावत्याला शक्ति येई| आणि रस्ता सापडे’ हा युगमंत्र आहे; तो या जिल्ह्यात प्रत्यक्ष कृतीतून साकार व्हावा, अशी आशा आणि अपेक्षा या पार्श्व भूमीवर ठेवावी का? (टीप : १) हा लेख लिहित असताना काही संदर्भ, व्यक्ती, घटना इ. उल्लेख अनवधाने राहून गेले असतील, त्याबद्दल क्षमा असावी. २) हा लेख लिहिण्यासाठी डॉ. तारा भवाळकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेते अरुण नाईक, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, तरुण पत्रकार अरुण नाईक, कवी महेश कराडकर, पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे इत्यादींबरोबर केलेल्या चर्चांचा आणि ग्रंथपाल यशवंत रास्ते यांनी पुरवलेल्या संदर्भ साहित्याचा उपयोग झाला. या सर्वांचे आभार.)

सांगलीतलं स्थळमाहात्म्य

सांगली जिल्ह्यातल्या काही स्थळांचं माहात्म्यही अभिमानाने सांगण्यासारखं आहे. आपल्या स्वर्गीय आवाजाने मराठी नाटकात आणि नाट्यसंगीतात गंधर्वयुग निर्माण करणार्याआ नटसम‘ाट बालगंधर्वांचं जन्मगाव नागठाणे. हजारो लावण्या लिहिणारे (विशेषत: ‘मुंबई नगरी बडी बाका| जशी रावणाची लंका’ ही मुंबईवरची प्रसिद्ध लावणी लिहिणारे) पठ्ठे बापूराव रेठरे हरणाक्षचे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं देवराष्ट्रे हे जन्मगाव. गुन्हेगार आणि दरोडेखोरांच्या अंतरंगाचा वेध घेणारे, ‘फकिरा’सार‘या कादंबर्यांयचे लेखक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज बुलंद करणारे शाहीर अण्णा भाऊ साठे वाटेगावचे. बहिष्कृतांच्या जीवनाचं समर्थ चित्रण करणारे शंकरराव खरात आटपाडीचे. ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ नेणारे गीतकार, ‘गीतरामायण’कार ग.दि. माडगूळकर आणि मराठी ग‘ामीण जीवनातल्या गाभ्यालाच भिडणारे प्रतिभावंत व्यंकटेश माडगूळकर माडगूळचे. पठ्ठे बापूराव यांना १९०९ साली पराभूत करणारे उमा-बाबू आणि तात्या सावळजकर (मोहना बटाव या वगाने सर्वदूर प्रसिद्ध झालेले) सावळजचे. ‘गंगायमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ अशी अमर गीतं लिहिणारे जनकवी पी. सावळाराम येडेनिपाणीचे. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’सारखी रसाळ भक्तिगीतं लिहिणारे आणि महाराष्ट्रातलं ‘पहिलं ग‘ामीण साहित्य संमेलन’ आयोजित करून मराठीतल्या नामवंत साहित्यिकांना आमंत्रित करणारे कवी सुधांशू, आणि ‘ललित गद्यातील बालकवी’ असा ज्यांचा सार्थ गौरव केला जातो ते ललित लेखक श्रीनिवास कुलकर्णी औदुंबरचे. ‘नागीण’, ‘दर्शन’सारख्या असामान्य कथा लिहिणारे चारुता सागर मळणगावचे. तमाशासार‘या लोककलेत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारे शिवा-संभा आणि त्यांचे विद्यमान वंशज काळू-बाळू कौलापूरचे, आणि भावगीतं आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवणारे वसंत पवार आणि राम कदम मिरजेचे. तर अपरिचित अनुभवातून जबरदस्त कथाविश्वआ निर्माण करणारे (‘अर्धसत्य’ या चित्रपटाच्या कथेमुळे चित्रपटाच्या दुनियेत गाजलेले) श्री. दा. पानवलकर सांगलीचे. आणि हो, वि.स. खांडेकरांची सांगली ही तर जन्मभूमी. इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे आणि किर्लोस्कर मासिकातून बुवाबाजी आणि अंधश्रद्धांवर कठोर प्रहार करणारे व्युप्तन्न पंडित महादेवशास्त्री जोशी मिरजेचे आणि ८१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य म. द. हातकणंगलेकर सांगलीचे. याशिवाय, कुस्तीमधे हिंदकेसरी मारुती माने ते आमदार संभाजी पवार, कि‘केटमधे विजय हजारे, बॅडमिंटनमधे नंदू नाटेकर, बुद्धिबळात भाग्यश्री साठे ही सांगलीची मानचिन्हं आहेत.

धार्मिक संदर्भानेही इथली काही ठिकाणं नोंद घेण्यासारखी आहेत. महाराष्ट्रामधे ‘दत्त संप्रदाय’ हा एक महत्त्वाचा संप्रदाय आहे. दत्तभक्तांच्यादृष्टीने पवित्र तीर्थस्थान असलेलं, कृष्णाकाठचं ‘औदुंबर’ हे ठिकाण या जिल्ह्यात आहे. दत्तावतार मानण्यात आलेले श्रीपाद श्रीव‘भ नरसिंह सरस्वतींनी इथं वास्तव्य केलं आणि या ठिकाणाला स्थानमहात्म्य प्राप्त झालं. त्यांच्या इथे स्थापित असलेल्या पादुकांना ‘विमलपादुका’ म्हणतात. गुरूद्वादशी, माघवद्य पंचमी आणि दत्तजयंतीच्या दिवशी इथे फार मोठा उत्सव होतो. (प्रसिद्ध कवी सुधांशु आणि त्यांचे कुटुंबिय या देवस्थानचे पुजारी) आणि सर्व महाराष्ट्रातले, कर्नाटकातले दत्तभक्त मोठ्या सं‘येने त्यावेळी येत असतात. कृष्णा काठीच ‘ब‘ह्मनाळ’ या गावी समर्थ रामदासांचे सहकारी आनंदमूर्ती यांची समाधी आहे. आनंदमूर्ती रामभक्त होते, तर त्यांचे गुरू रघुनाथ स्वामी शिवभक्त होते. त्यांचीही समाधी आनंदमूर्तींच्या समाधीसमोर आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्री रामनवमी आणि शिवरात्री असे दोनही उत्सव साजरे होतात. समर्थ रामदासांनी स्वत: स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर तुंगला आहे आणि त्यांच्या स्त्रीशिष्या वेणाबाई यांचा मठ मिरजेला आहे.

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli